दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर, संत श्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचे रत्नागिरी शहरात पूर्णाकृती पुतळे उभारून स्वातंत्र्य दिनी लोकार्पण करणार : ना उदय सामंत

रत्नागिरी दि. ७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे भूषण असलेल्या दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर आणि त्यांचे गुरु संत श्रेष्ठ श्री गाडगेबाबा या महान विभूतींचे त्यांच्या लौकिकाला शोभेल अशा पद्धतीने पूर्णाकृती पुतळे रत्नागिरी शहरात उभारण्यात येतील आणि या पुतळ्यांचे येत्या स्वातंत्र्यदिनी लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. उदय सामंत यांनी आज रत्नागिरी दौऱ्यात दिली. दानशूर भागोजी शेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वारी साळवी स्टॉप येथे तर संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा पुतळा जयस्तंभ येथील हुतात्मा अनंत कान्हेरे उद्यानात उभारण्यात येईल, असे नामदार सामंत यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार श्री. राजाभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. राजीव किर, रत्नागिरी जिल्हा परीट समाजाचे ज्येष्ठ सल्लागार श्री. प्रभाकर कासेकर, समाज भूषण श्री सुरेंद्र घुडे, रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे उपाध्यक्ष श्री. कांचन मालगुंडकर यांनी मंत्री महोदयांशी चर्चा केली आणि या स्मारक उभारणीच्या कामी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. हे पुतळे उभारण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रथमपासूनच सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button