लांजा प्रशालेचे उपमुख्याध्यापक सुनिल जाधव व पर्यवेक्षक भैरु सोनवलकर यांच्या सेवानिवृत्तीपर गौरव समारंभाचे ०३ जुलै रोजी आयोजन.
लांजा प्रशालेचे उपमुख्याध्यापक सुनिल जाधव व पर्यवेक्षक भैरु सोनवलकर यांच्या सेवानिवृत्तीपर गौरव समारंभाचे ०३ जुलै रोजी आयोजन. लांजा :- न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कला ,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,लांजा या प्रशालेचे उपमुख्याध्यापक सुनिल जाधव व पर्यवेक्षक भैरू सोनवलकर हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी प्रशालेला व संस्थेला दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांच्या सेवानिवृत्तीपर गौरव समारंभाचे आयोजन बुधवार ०३ जुलै २०२४ रोजी प्रशालेच्या विद्यार्थी सभागृहात दुपारी ०२ :३० वाजता करण्यात आले अाहे. कोल्हापूर जिल्हा,हातकणंगले तालुका,मु.चोकाक इथून आलेले सुनिल जाधव सर यांनी एम.ए.,बी.एड.मराठी व इतिहास विषयात पूर्ण केले.त्यांनी बी.ए.राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयामधून तर बी.एड.ताराराणी अध्यापक महाविद्यालय कोल्हापूर येथून पूर्ण केले.शिक्षणाचे महत्त्व जाणणा-या कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून सुनिल जाधव यांचे दोन्ही भाऊ व पत्नी उच्चशिक्षित असून शैक्षणिक व शासकीय सेवेत कार्यरत आहेत.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आॅगस्ट १९९२ मध्ये ते लांजा प्रशालेत रूजू झाले.गत ३१ वर्षात प्रशालेतील विद्यार्थीप्रिय, निर्गवी,शांत,प्रसिध्दीपराड:मुख शिक्षक म्हणून त्यांनी लौकीक प्राप्त केला अाहे.तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक व इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे भैरू सोनवलकर जुलै १९९३ मध्ये लांजा प्रशालेत रूजू झाले.गत ३० वर्षाच्या अध्यापकीय कार्यकाळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविताना एक अभ्यासू, मनमिळाऊ,विद्यार्थीप्रिय, तज्ञ इंग्रजी शिक्षक म्हणून लांजा तालुक्यात त्यांनी प्रसिध्दी मिळविली आहे.एकुणच आपल्या मनमिळाऊ व सहकार्यशील स्वभावाने व विद्यार्थी विकासाच्या ध्यासाने या दोन्ही अध्यापकांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा लोकसंपर्क गोळा केला आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लांजा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक व विद्यमान सल्लागार गुरूवर्य गणपत शिर्के हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंत शेट्ये भूषविणार आहेत. तरी या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यासाठी आजी-माजी विद्यार्थी,पालक,शिक्षणप्रेमी नागरिक व मित्रमंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे उपकार्याध्यक्ष सुनिल कुरूप व न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कला ,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, लांजा या प्रशालेच्या मुख्याध्यापिका विद्या आठवले यांनी केले आहे.