
रेल्वेचा बर्थ कोसळल्याने खाली झोपलेल्या इसमाचा मृत्यू
रेल्वेत प्रवासात मधल्या बर्थची साखळी चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे बर्थ खाली कोसळून केरळमधील एक ६० वर्षीय वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या बाबत रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) बुधवारी माहिती दिली. ही घटना मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये १६ जून रोजी घडली. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने हात झटकत सीट चांगली असल्याचे स्पष्ट केले आहे.अली खान सी.के. असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अली हे १६ जून रोजी त्यांच्या मित्रासोबत ट्रेन क्रमांक १२६४५ ‘एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मिलेनियम सुपरफास्ट एक्स्प्रेस’ने प्रवास करत होते. ते स्लीपर कोचच्या खालच्या बर्थवर झोपले होते. ते आग्रा येथे जात होते. दरम्यान, ही गाडी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातजात असताना अचानक वरच्या बर्थची साखळी सुटली आणि मधला बर्थ हा खाली कोसळला. या घटनेत अली यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मानेला जखम झाली होती. त्यांना सुरुवातीला रामागुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, २४ जून रोजी उपचारादरम्यान अली यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com