एसयूव्ही कारच्या माध्यमातून लंडन ते ठाणे असा 18 हजार 300 किलोमीटरचा प्रवास करणारा अवलिया
मूळचे ठाण्यातील रहिवासी असलेल्या विराजित मुंगळे यांनी आपल्या आईला भेटण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे.विराजित यांनी आपल्या एसयूव्ही कारच्या माध्यमातून लंडन ते ठाणे असा 18 हजार 300 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांनी 16 देशांमधून मार्गाक्रमण करत 59 दिवसांत ठाणं गाठलं.मिळालेल्या माहितीनुसार, विराजित यांच्या आई ठाण्यातील रौनक पार्क परिसरात राहतात. ते आपल्या आईला भेटण्यासाठी नेहमी येतात. पण, या वेळी त्यांनी कारने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 एप्रिल रोजी आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती आणि 17 जूनला ते ठाण्यात पोहचले. यूके, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, लिथुआनिया, लॅटव्हिया, इस्टोनिया, रशिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, चीन, तिबेट, नेपाळ आणि भारत असा त्यांचा प्रवासाचा मार्ग होता. प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात विराजित यांच्यासोबत नेपाळचे रोशन श्रेष्ठा होते. दोघांनी काठमांडूपर्यंत एकत्र प्रवास केला.आयटी प्रोफेशनल असलेल्या विराजित यांनी दोन महिने बिनपगारी सुट्टी घेतली. प्रवासादरम्यान प्रत्येक देशातील वैविध्यपूर्ण निसर्ग आणि संस्कृती अनुभवत आपला प्रवास पूर्ण केला. विशेष म्हणजे प्रत्येक देशात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सर्व आवश्यक परवानग्या मिळवल्या होत्या.या बाबत ते म्हणाले, “ब्रिटिश नागरिक असल्यामुळे मला युरोपियन देशांमध्ये किंवा इतर कोणत्याही देशात प्रवेश करताना कोणतीही अडचण आली नाही. माझी सर्व कागदपत्रं व्यवस्थित तयार होती. प्रवासादरम्यान कायदेशीर प्रक्रियेची काळजी घेण्यात आली होती. प्रवासात बहुतेक ठिकाणी उन्हाळा होता. आम्हाला कुठेही फार खराबहवामानाचा सामना करावा लागला नाही. आम्ही 5 हजार 200 मीटर उंचीवर देखील पोहोचलो होतो. काही ठिकाणी बर्फ आणि थंडी होती. एकंदरीत सर्व तयारी केल्यामुळे हा आश्चर्यकारक अनुभव चांगला होता.”प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात थकवा टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी काळजीपूर्वक नियोजन केलं होतं. संपूर्ण 18 हजार 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे तीन हजार लिटर इंधन लागलं. विराजित मुंगळे यांनी केलेला प्रवास हा मानवी सहनशक्ती आणि शोध भावनेचा पुरावा आहे.www.konkantoday.com