जागतिक मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन उपक्रमातील खेळाडूंचा कोकण कोस्टल मॅरेथॉन टीमतर्फे सत्कार
प्रतिनिधी रत्नागिरी* : कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या टीमने चीनमध्ये झालेल्या मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन उपक्रमात सहभागी झालेल्या महेश मिलके स्विमिंग अकॅडमीमधील सर्व अॅथलिट्सची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.चीनमधील झेंगझोऊ येथे झालेल्या मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन उपक्रमात ५२ देशातील खेळाडू सहभागी झाले होते. यात भारताचं प्रतिनिधीत्व महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, बिहार येथील २२ जणांनी केलं होतं आणि त्यात रत्नागिरीतील महेश मिलके स्विमिंग अकॅडमी येथील ७ जण होते. ही गोष्ट भारतासाठी, राज्यासाठी जितकी अभिमानास्पद आहे तितकीच रत्नागिरीचा नावलौकिक वाढवण्यास देखील हातभार लावणारी आहे, असं मनोगत या वेळी कोकण कोस्टल मॅरेथॉन टीमने व्यक्त केलं. या मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन उपक्रमात करण मिल्के याने रौप्य पदक मिळवल्याबद्दल त्याचे विशेष कौतुक करण्यात आले. त्याच्या बरोबरीने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तनया मिलके, आयुष काळे, निधी भिडे, कार्तिकी भुरवणे, मीरा भुरवणे आणि आर्यन घडशी यांचंदेखील विशेष अभिनंदन करण्यात आलं.भारतामध्ये क्रिकेट वगळता इतर खेळाना म्हणावे तसे ग्लॅमर नाहीये आणि म्हणून इतर खेळ प्रकारात सहभागी होत असणाऱ्या क्रीडापटूंची आणि त्यांच्या यशाची म्हणावी तशी दखल सर्व पातळीवर घेतली जात नाही, याला अपवाद हा समाजानेच निर्माण केला पाहिजे आणि त्याची सुरवात कोकण कोस्टल मॅरेथॉन, रोलर कोस्टर सायक्लोथॉन यासारख्या उपक्रमांमधून झाली आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेली कोकण कोस्टल मॅरेथॉन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन या उपक्रमांमुळे लोकांचे लक्ष रत्नागिरीकडे जायला लागलं आहे. करण मिलके याने पेन्टॅथलॉन उपक्रमात मिळवलेले रौप्यपदक हे देखील रत्नागिरीच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवणारे असे आहे, त्यामुळे विशेष आनंद झाल्याचं टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या प्रसाद देवस्थळी यांनी सांगितलं.टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या उदय लोध यांच्या हस्ते पुस्तक देऊन करण मिलके आणि सर्व अॅथलिटचा सन्मान करण्यात आला. फोकस आणि सातत्य ठेवलत तर काहीही अशक्य नाही हा कानमंत्र या वेळी उदय लोध यांनी सर्वाना दिला.या सर्व क्रीडापटूंचे मार्गदर्शक महेश मिलके यांनी अपुऱ्या सुविधा, या खेळप्रकाराविषयी सर्व स्तरावर असलेला माहितीचा अभाव, या खेळासाठी येणारा खर्च या सर्व गोष्टींवर मात करून आपल्या रत्नागिरीतील सर्व सहभागी अॅथलिटनी संपुर्ण जगभरातील सहभागी स्पर्धकांच्या तोडीस तोड खेळ केल्याचं सांगितलं. भारतात एखादा खेळाडू जिंकल्यावर त्या खेळाकडे आणि खेळाडूकडे लक्षं जातं पण परदेशात वय वर्ष ५/६ पासूनच मुलं कुठल्या खेळात पारंगत होऊ शकतील, हे शासन ठरवतं आणि त्यांची पूर्ण जबादारी घेतं हा मोठा फरक अनुभवायला मिळाल्याचं मिलके या वेळी म्हणाले.सातत्याने स्विमिंग केल्याचा फायदा या स्पर्धेवेळी झाला, असं सर्व सहभागी अॅथलिटनी सांगितलं. भविष्यात जास्तीत जास्त खेळाडू अशा उपक्रमात सहभागी होतील असा आशावाद या वेळी महेश मिलके यांनी व्यक्त केला. कोकण कोस्टल मॅरेथॉन, रोलर कोस्टर सायक्लोथॉनसाठी देखील आम्ही सहकार्य करू, हे आश्वासन त्यांनी दिले.या वेळी टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनचे योगश मोरे, डॉ. नितीन सनगर, महेश सावंत, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, सर्व जलतरणपटू, आनंद कीर, श्री. पवार, श्रीमती विलणकर, यश कीर कुटुंबीय, भिडे कुटुंबीय, काळे कुटुंबीय, स्विमिंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.