नाचणे येथील आगाशे स्टोअर्सच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
रत्नागिरी :* आगाशे स्टोअर्समध्ये एका ग्राहकाचे सोन्याचे किंमती ब्रेसलेट पडले होते. ते पडलेले सापडल्यानंतर स्टोअर्समधील कॉम्प्युटर विभागातील महिला कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे ते मालकांकडे दिले व संबंधित व्यक्तीला ते ब्रेसलेट परत देण्यात आले. याबद्दल संबंधित व्यक्तीने आगाशे स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करून आभार मानले.सोन्याचे महागडे ब्रेसलेट सापडल्यानंतर आगाशे स्टोअर्सच्या कॉम्प्युटर विभागातील कर्मचारी तनया उमेश सावंत हिने संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ती व्यक्ती तिथे जवळ नसल्यामुळे तिने ते ब्रेसलेट मालक अनंत आगाशे यांच्याकडे आणून दिले. त्यानंतर संपर्काला काहीही आधार नव्हता. त्यानंतर श्री. आगाशे यांनी आपल्या दुकानातील सीसी टीव्हीचा आधार घेऊन चित्रीकरण पाहिले व संबंधित ग्राहक समजला. काही वेळाने एक व्यक्ती आपलं ब्रेसलेट तुमच्याकडे पडले का, असे विचारायला आले. त्यावेळेला खात्री करून घेऊन त्या ग्राहकाला ते ब्रेसलेट देण्यात आलं. गेली ४२ वर्ष श्री अनंत वस्तू भांडार पासून आगाशे स्टोअर्स प्रा. लि. हा व्यवसाय करणारे आगाशे परिवार हा आपल्या वस्तूंच्या दर्जा तसेच प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहेच.याबद्दल अनंत आगाशे यांनी सांगितले की, ग्राहकांना त्रास होऊ नये, सर्व वस्तू उत्तम व वाजवी दरात कशा उपलब्ध करता येतील, ग्राहकांचे हित जपले जाते. त्यामुळे कधी ग्राहकांचे पैसे जास्त येतात, कधी ग्राहक वस्तू विसरून जातो, प्रत्येक वेळेला त्यांना फोन करून ती वस्तू आठवणीने परत दिली जाते. त्याचबरोबर अनेक वेळेला जे आगाशे स्टोअर्सचे पुरवठादार आहेत, त्यांच्याकडून सुद्धा माल जास्त येतो किंवा बिलामध्ये माल कमी लिहिला जातो. प्रत्यक्ष जास्त येतो, पण प्रत्येक वेळी आगाशे स्टोअर्सचे कर्मचारी प्रामाणिकपणे प्रत्येक ग्राहकाला आणि प्रत्येक व्यापाराला ही गोष्ट निदर्शनास आणून देतात. हा संस्थेचा मोठेपणा नाही पण कुणाच्याही पैशाचं मोल हे जास्त आहे त्यामुळे ते त्यांचं कर्तव्य समजतात.