मालाडमधील एका डॉक्टरने ॲपमार्फत मागविलेल्या बटरस्कॉच आइस्क्रीममध्ये तुटलेले मानवी बोट सापडल्याने खळबळ
मालाडमधील एका डॉक्टरने ॲपमार्फत मागविलेल्या बटरस्कॉच आइस्क्रीममध्ये तुटलेले मानवी बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित आइस्क्रीम कंपनीकडून उत्तर न मिळाल्याने या किळसवाण्या प्रकाराची तक्रार डॉक्टरने मालाड पोलिस ठाण्यात केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार ब्रेंडन फेरॉव (२६) यांची बहिण जेसिका (२२) हिने १२ जून रोजी झेप्टो या ॲपवरून पीठ आणि तीन मँगो आइस्क्रीमची ऑर्डर केली. मात्र, त्यांना दोन मँगो आणि एक बटरस्कॉच आइस्क्रीम पाठविण्यात आले. जेवणानंतर ब्रेंडन व जेसिका यांनी बटरस्कॉच आइस्क्रीम खायला घेतले असता त्यांच्या तोंडात एक मोठा तुकडा आला. तो नख असलेला मांसाचा तुकडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.आधारची मदत, बोटाची डीएनए टेस्ट करणार तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बोट कोणाचे आहे, याचा तपास करताना आधार कार्ड केंद्राची मदत घेतली जाणार आहे. तसेच त्याची डीएनए चाचणीही करण्यात येणार आहे. फॅक्टरीत घडलेल्या अपघातात एखाद्याचे बोट पॅकेजिंगदरम्यान वेगळे होऊन ते आइस्क्रीममध्ये पडले असावे. तसेच आइस्क्रीम डुप्लिकेट असल्याचाही संशय असून, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला तपास करण्याची विनंती करण्यात आली आहे.