
बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी त्या आदिवासीच्या शोधार्थ पथके रवाना
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडी येथे बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी येथील वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलेल्या त्या संशयितांची वनविभागाची पोलीस कोठडी १० जून रोजी संपुष्टात येणार आहे. यामुळे या चौघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी महत्वाचे धागेदोरे वनविभागाच्या हाती लागल्याचे समजते. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने तपास गतिमान केला असून बिबट्यांची शिकार करणार्या त्या आदिवासी व्यक्तीच्या शोधार्थ विविध ठिकाणी पथके देखील पाठविण्यात आल्याचे समजते.
चिपळूण वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणाचा शिताफीने छडा लावत दिलीप सावळेराम कडलग (घाटकोपर, मुंबई), अतुल विनोद दांडेकर (चेंबूर-मुंबई), विनोद पांडुरंग कदम (सावर्डे-चिपळूण), सचिन रमेश गुरव (गोविळ-लांजा), यांना गजाआड केले आहे. या चौघांकडून ६ लाख रुपये किंमतीची बिबट्याची ८ नखे वनविभागाच्या पथकाने हस्तगत केली आहे. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा व दुचाकी देखील जप्त केली आहे. www.konkantoday.com