प्रवासापूर्वी गाडीची अचूक वेळ तपासून घेण्याचे कोकण रेल्वे महामंडळाचे आवाहन
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांसाठी उद्या दिनांक 10 जून 2024 पासून पावसाळी वेळापत्रक लागू होत आहे. दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असलेल्या भागातून गाड्यांच्या वेगावर नियंत्रण येत असल्यामुळे कोकण रेल्वेकडून दरवर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाते. या बदलामुळे प्रवाशांनी आपण प्रवास करीत असलेल्या गाडीची वेळ प्रवासापूर्वी तपासून घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, मार्गावर चिखल माती येणे, पावसाचे पाणी येऊन मार्ग विस्कळीत होणे अशा बाबी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक आखले जाते. त्यानुसार काही गाड्यांच्या वेळा बदलाव्या लागतात तर काही गाड्यांची फ्रिक्वेन्सी बदलावी लागते. या कारणामुळेच कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवल्या जातात. इतर वेळी वंदे भारत एक्सप्रेस सहा दिवस तर तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवली जाते. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी एक्सप्रेस आठवड्यातून दोनच दिवस चालवण्यात येते. कोकण कन्या ,तुतारी, वंदे भारत, जन शताब्दी,तेजस,मांडवी अशा गाड्या नव्या वेळापत्रक नुसार अर्धातास ते एक तास लवकर धावणार आहेत.
www.konkantoday.com