वेतोशी येथील तरूणाची म्हैशी खरेदीप्रकरणात अडीच लाखांची फसवणूक
मुरा जातीच्या ६ म्हैशी विक्री करण्याच्या बहाण्याने रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथील एका तरूणाची तब्बल २ लाख ६३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुजरातमधील दोन संशयितांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणुकीची ही घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४१ वा. ते २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.२० वा. या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी अनिस आदमभाई घांची उर्फ आबु अमितभाई आदमभाई घांची (दोन्ही रा. थराद, गुजरात) अशा दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात जगदीश कृष्णा झोरे (२९, रा. वेतोशी, धनगरवाडी, रत्नागिरी) यांनी रविवार २ जून रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जगदीश झोरे हे दुग्ध व्यावसायिक आहेत ते वेतोशी येथे म्हैशी पाळून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना मुरा जातीच्या म्हैशींची दुग्ध व्यवसायासाठी गरज होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा मित्र आाशिष माने याने मुरा जातीच्या म्हैशी खरेदी केल्या असल्याने त्याच्याकडे चौकशी केली होती. त्यानंतर या दोघांनी मोबाईलवरून दोन्ही संशयित आरोपींशी मोबाईलवर संपर्क केला. त्यांना आपल्याला मुरा जातीच्या सहा म्हैशी पाहिजे असल्याचे कळविले होते.त्यानुसार संशयितांनी त्यांना व्हॉटसऍपवर म्हैशींचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी झोरे यांनी संशयितांनाा फोन पेद्वारे प्रथम ९८ हजार रुपये आणि त्यानंतर बँक खात्यात १ लाख ६५ हजार रुपये पाठवलेे. त्यानंतर संशयित आरोपी फिर्यादी झोरे यांना दोन दिवसात म्हैशी पाठवतो असे सांगितले. परंतु दोन दिवसानंतरही म्हैशी आल्या नाहीत. तसेच आरोपींनी फिर्यादी झोरेशी संपर्कही बंद करत त्यांची फसवणूक केली. www.konkantoday.com