मतदानोत्तर चाचण्याचा अंदाज खोटा! लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्याचा काँग्रेस नेत्यांना विश्वास!!
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खोटे असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी रविवारी केला. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मतदानोत्तर चाचण्यांमध्ये जे अंदाज वर्तवण्यात आले आहेत, त्यापेक्षा पक्ष अधिक चांगले काम करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विविध राज्यांतील प्रमुख नेते, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी दृकश्राव्य संवाद साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनीही काँग्रेस उमेदवारांशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. मतमोजणीच्या दिवशी हेराफेरीचे कोणतेही प्रयत्न रोखण्यासाठी सतर्क रहा, असा सल्ला या नेत्यांनी दिला़ मतदानोत्तर चाचण्या बोगस असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीतील हेराफेरीचे समर्थन करण्याचा हा जाणूनबुजून केलेला प्रयत्न आहे. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खेळल्या गेलेल्या मानसिक खेळाचा हा भाग आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.www.konkantoday.com