महाविकास आघाडी व महायुतीत कोकण पदवीधरच्या जागेवरुनही रस्सीखेच, काँग्रेसचे पक्ष समन्वयक रमेश कीर हे उमेदवारीसाठी आग्रही
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकांचे वेध लागले आहेत. २६ जूनला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत तर १ जुलैला निकाल लागणार आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीमधील इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.ठाकरे गटाकडून घटक पक्षांशी चर्चा न करताच पुन्हा एकदा मुंबई शिक्षक व पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाने मुंबई पदवीधर जागेवर दावा केला. मात्र भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवताना प्रमुख नेत्यांचा कस लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच महाविकास आघाडीत कोकण पदवीधरच्या जागेवरुनही रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. कोकण पदवीधर जागेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस दोघेही आग्रही आहेत.ठाकरे गटाकडून सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.परंतु याठिकाणी काँग्रेससुद्धा आग्रही असून रायगडमधील काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर, काँग्रेसचे पक्ष समन्वयक रमेश कीर हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता या चार जागांचा तिढा महाविकास आघाडी तसेच महायुतीचे पक्षश्रेष्ठी कसा सोडवतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.www.konkantoday.com