संजय राऊतांनी प्रसिद्धीसाठी वायफळ बडबड करु नये-काँग्रेस नेते विकास ठाकरे
संजय राऊतांनी प्रसिद्धीसाठी वायफळ बडबड करु नये, अशी टीका काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केली आहे. संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूर लोकसभा निवडणूकीबद्दल विधान केलं होतं.यावर आता नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह आणि फडणवीसांनी रसद पुरवली, असा दावा संजय राऊतांनी केला होता. मात्र, आता विकास ठाकरेंनी त्यांना खडेबोल सुनावले. विकास ठाकरे म्हणाले की, “संजय राऊत जे बोलतात ते त्यांनी पुराव्यानिशी बोलावं. फुकट वायफळ बडबड करुन प्रसिद्धीसाठी बोलू नये.””भाजपशी त्यांचं काय दुखणं ते त्यांनी तिकडे निपटावं. परंतू, महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी असलेली बंधनं पाळावीत. आम्हीसुद्धा राऊतांच्या विरोधात खूप काही बोलू शकतो. निवडणूकीच्या तोंडावर तुम्ही गडकरींची प्रशंसा करत होते. आता निवडणूक झाल्यावरही त्यांचीच प्रशंसा करत आहात. मग तुम्ही महाविकास आघाडीसोबत कशाला आलात गडकरींसोबत दुसरा पक्ष काढून आघाडी करायची होती,” असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, “राऊतांनी आपल्या बोलण्यात तारतम्य ठेवावं. नागपूरबद्दल त्यांना कवडीचंही माहिती नाही. त्यांना नागपूरची एबीसीडीही माहिती नाही. महाविकास आघाडीतील एक पक्ष अशा पद्धतीने बोलत असेल तर काँग्रेसने आपला विचार करावा आणि त्यांना समज द्यावी, अशी माझी मागणी आहे. मी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहे,” असेही ते म्हणाले.www.konkantoday.com