मविआला चांगल्या जागा मिळतील! गजानन कीर्तिकर यांच्या दाव्याने शिवसेनेत खळबळ
मुंबई – लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील,असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळते खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज आघाडीच्या विजयाचा दावा केला. कीर्तिकर यांच्या या दाव्याने महायुती विशेषतः शिवसेनेत खळबळ उडाली असून निवडणूक निकालानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवारांनी चांगली लढत दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा दावाच त्यांनी यावेळी केला.‘मी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दीड-दोन वर्षांपूर्वी गेलो, त्यावेळी माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, याची खंत वाटते,’’ असेही कीर्तिकर यांनी सांगितले.जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी वडिलांच्या सोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली. त्यामुळे लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.www.konkantoday.com