
वाळूची तस्करी करणाऱ्यांची मुजोरी वाढली, सिंधुदुर्गात कुडाळात नायब तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ महसूल विभागाकडून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे चार डंपर पकडून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना, त्यातील दोन डंपर चालकांनी कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव (30, सध्या राकुडाळ) व त्यांच्या समवेत असलेल्या कर्मचार्याच्या अंगावर डंपर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी पहाटे 4.15 च्या सुमारास पिंगुळी-गुढीपूर येथे घडली. दोन्ही डंपर चालकांनी अंधाराचा फायदा घेत डंपरसह पलायन केले. याप्रकरणी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही डंपर चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित दोन डंपर कारवाईसाठी महसूल पथकाने तहसील कार्यालय आवारात आणून उभे केले आहेत.
आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, महसूल पथक शुक्रवारी रात्री कर्त्यव्यावर होते. यापूर्वी मी अवैध व बिगर परवाना वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाया केल्या आहेत. वाळू व्यावसायिकांमध्ये पूर्वीपासूनच माझ्यावर राग आहे. मी 17 जानेवारी रोजी रात्री 11 वा. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीची तपासणी करण्याकरीता जात असताना, आम्हाला गुढीपूर-पिंगुळी शिक्षक कॉलनी जवळ डंपर दिसून आले. त्या डंपरांची तपासणी केली असता चार डंपर अवैध वाळूने भरल्याचे आढळले. तिथे कोणीही इसम दिसून आले नाही. नंतर सुमारे 1 वा. डंपर क्र. MH 07 X 0267 चा चालक तेथे आला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले.
नीलेश कांबळे यांनात्या इसमासह पाठवून वाळुसह डंपर तहसील कार्यालय परिसरात लावला. नंतर उर्वरित 3 डंपर चालकांची वाट पाहत थांबलो. 18 जानेवारी 2025 रोजी पहाटे 4.12 वा. डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्याने मी आवाज देत पुढे गेलो. डंपर क्र. MH 06 -Q 7097 वरील चालकाला खाली उतरण्याचा इशारा केला असता त्याने माझ्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
डंपर तसाच वेगात पुढे निघून गेला. थोडे अंतर मी त्याचा पाठलाग केला.डंपर थांबलेल्या मुळ जागीही ओंकार केसरकर यांच्यावर येथील डंपर क्र. MH 07. C 6631 च्या चालकाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हस डंपर मुंबई गोवा हायवेच्या दिशेने निघून गेला.