तारक मेहतामधील सोढीची घरवापसी
‘तारका मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘रोशन सिंग सोढी’ची भूमिका निभावणारे ‘गुरूचरण सिंग’ अखेर आपल्या घरी परतले आहेत. मागील 25 दिवस ते बेपत्ता होते. या प्रकरणी त्यांच्या वडिलांनी दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली होती. गुरूचरण सिंग अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे कुटुंब त्रस्त झाले होते. कारण त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती तसेच ते नेमके कुठे आहेत? काय करत आहेत? याचा अंदाजही येत नव्हता.अखेर 25 दिवसांनंतर गुरूचरण सिंग आता स्वगृही परतले आहेत. पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, “दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेकरिता गेलो होतो”. यादरम्यान अमृतसर, लुधियाणा आणि विविध ठिकाणी असणाऱ्या गुरुद्वारांमध्ये ते थांबले होते. आता घरी परतले पाहिजे, असे वाटले म्हणून त्यांनी परतीची वाट धरली.गुरूचरण सिंग 22 एप्रिल रोजी मुंबईमध्ये येण्यासाठी घराबाहेर पडले. पण ना ते विमानामध्ये बसले ना ते घरी परतले. यानंतर कोणतीही माहिती समोर न आल्याने गुरूचरण सिंग यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अपहरणाच्या दृष्टीकोनातून तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या मते, गुरूचरण 24 एप्रिलपर्यंत दिल्लीमध्येच होते.तपासादरम्यान समजले की, गुरूचरण यांना मुंबईमध्ये घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही त्यांनी चुकीची माहिती दिली. यादरम्यान गुरूचरण यांनी एटीएममधून 14 हजार रुपये काढल्याचीही माहिती समोर आली आहे. दुसरीकडे गुरुचरण यांचा कल अध्यात्माकडे वाढत असल्याचे चौकशीमध्ये समोर आले.www.konkantoday.com