
गुरख्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनी त्यांची नोंदणी संबंधित पोलिस ठाण्यात न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार
रत्नागिरी:- तालुक्यातील पावस नजीकच्या गोळप येथील नेपाळ्यांच्या दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले उचलली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम संपला की परत त्यांच्या मूळ गावी जातात. गेल्या वीस वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात अशा नेपाळी रखवालदारांकडून गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. परप्रांतीय खलाशी, बागेतील कामगार यांच्यामध्ये वाद होतात, खून होतात. तपास करताना लक्षात येते की पोलिसांकडे अशा अनेक कामगारांची नोंद नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासात अनेक अडचणी येतात. बरेचदा असे रखवालदार गुन्हे करून त्यांच्या गावाला गेल्यानंतर त्या घटनेचा तपास होऊ शकत नाही. रत्नागिरीत असे प्रकार वाढल्याने जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात आंबा, मासेमारीसाठी येणाऱ्या नेपाळी व्यक्तींची त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनी पोलीस स्थानकात नोंदणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी न करणाऱ्या आंबा बागायतदार, नौका मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.