घाटकोपर दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर परिषद सतर्क… 200 होर्डिंग्ज धारकांना नोटीसा
रत्नागिरी : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची रत्नागिरी पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील २०० अधिकृत होल्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल देण्याची नोटीस मालकांना बजावली आहे. पालिकेच्या अभियंत्यांकडूनही त्याची पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील होर्डिंग्ज आता पालिकेच्या रडारवर आहेत.राज्यभरातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग तातडीने काढण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वादळ किंवा अन्य आपत्तीने अशा प्रकारचे होर्डिंग किंवा कुठलेही बांधकाम पडू शकते. त्यामुळे त्याबाबत राज्यभर उपाययोजना करण्याच्या सूचना आपत्तकालीन विभागाचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत.धोकादायक असलेले होर्डिंग तत्काळ काढा किंवा त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.