सततच्या बदलत्या वातावरणामुळे मासेमारी व्यवसाय आला अडचणीत
वातावरणातील सततच्या बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून त्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. मासेमारी हा कोकणातील मुख्य व्यवसाय असून, जिल्ह्यातील ७,५०० पेक्षा जास्त कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असली तरी मागील काही दिवसांपासून ही उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छिमार कुटुंबियांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ऑगस्ट महिन्यापासून पारंपारिक मासेमारी पाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरू होते. मात्र गेले काही महिने मासे मिळण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे. गेल्या काही दिवसात वातावरणात अनेकदा झालेल्या बदलांमुळे बहुतांश मासेमारी नौका किनार्यावरच नांगरून ठेवण्यात आल्या. ज्यावेळी वातावरण चांगले होते, त्यावेळी खोल समुद्रात जावूनही मासे अत्यल्प प्रमाणात मिळाले. वातावरणातील बदलामुळे मत्स्य साठ्यांवर परिणाम झाला असण्याचीही शक्यता आहे. मासे कमी प्रमाणात मिळत असल्याने ज्या नौका समुद्रात जातात, त्यांच्या खलाशांचा खर्चही भागत नाही. मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम मासळीच्या निर्यातीवरही झालेला आहे. www.konkantoday.com