प्रसिद्ध फोटोग्राफर व्यावसायिक संजय मयेकर यांचे निधन
रत्नागिरीतालुक्यातील काळबादेवी येथील प्रसिद्ध फोटोग्राफर व्यावसायिक संजय केशव मयेकर यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६१ वर्षांचे होते. अल्पावधीतच त्यांनी फोटोग्राफी व्यवसायात मोठे नाव कमावले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली. संजय मयेकर यांनी मिहिर फोटो क्लिक या नावाने काळबादेवी येथे आपला व्यवसाय सुरू केला. एक धडपड्या व्यावसायिक म्हणून ते पंचक्रोशीत आणि बघताबघता रत्नागिरीत प्रसिद्ध झाले होते. काळबादेवी येथे सुरू केलेला व्यवसाय त्यांनी बसनी येथे स्थायिक होऊन वाढवला. कोरोना नंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली होती. मागील कालावधी त्यांचे जीवन ऑक्सिजन सिलिंडरच्या साहाय्याने सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर काळबादेवी फडजीवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा संसार आहे.