RTE प्रवेशाला १५ दिवसांची मुदत वाढ, ४८००० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
राज्यातील ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश करण्याची शेवटची मुदत उद्या (मंगळवारी) संपणार आहे. ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेशाप्रमाणे राज्यातील ७५,२६४ शाळांमध्ये नऊ लाख ६४ हजार ३९४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशासाठी राज्यातील एक लाख ८८ हजार २०० पालकांनीच ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यामुळे उर्वरित पालकांसाठी आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत आणखी १५ दिवस वाढविली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आरटीई प्रवेशाला सुरवात झाल्यानंतर आपल्या पाल्याला इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal यावर ऑनलाइन अर्ज करायला सुरवात केली आहे. आतापर्यंत दोन लाखांपर्यंत अर्ज प्राप्त झाले, मात्र, प्रवेश निश्चित करण्याचे प्रमाण एकूण अर्जांच्या ३० टक्क्यांपर्यंतच आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ३७८ शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्क्याप्रमाणे ४४ हजार ७७ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहेत. पण, आतापर्यंत चार हजार २५ पालकांनी ऑनलाइन अर्ज केले असून त्यापैकी केवळ ८१० पालकांनीच मुलांचा प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित तीन हजार २१५ पालकांनी अजूनही शाळा व प्रवेश निश्चित केलेला नाही. अशी वस्तुस्थिती राज्यभर आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय नसल्याने पालकांची निराशा झाल्याची स्थिती आहे. www.konka today.com