
मिर्या बंधार्यावर कोट्यवधीचा निधी खर्च होऊनही ग्रामस्थांना धोका; अप्पा वांदरकर यांचा उपोषणाचा इशारा
रत्नागिरी : रत्नागिरीच्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी खर्च होऊनही ग्रामस्थांना धोका कायम आहे. त्यामुळे याठिकाणी काम करणारा ठेकेदार व पतन विभागाच्या अधिकार्यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी 8 सप्टेंबर रोजी आमरण उपोषणचा इशारा येथील ग्रामस्थ शांताराम उर्फ अप्पा वांदरकर यांनी दिला आहे.
मिर्या किनार्यांची पावसाळ्यामध्ये उधाणात प्रचंड धूप होते. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये नारळाच्या बागा, घरांच्या संरक्षण भिंतीही समुद्राने गिळंकृत केलेल्या आहेत. त्यानंतरही बंधारा दुरूस्ती कामाची स्थिती ‘जैसे थे’च असल्याची प्रचिती याठिकाणी येत आहे. धूपप्रतिबंधक बंधार्याच्या प्रस्तावित केलेल्या 169 कोटीच्या कामाचा शुभारंभ 26 डिसेंबर 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. याचे काम सुरू झाले असले तरी पावसाळ्यात अनेक ठिकाणी बंधारा ढासळला आहे. पावसामुळे काही ठिकाणी डागडुजीही रखडलेली होती. काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली, परंतु टाकलेला भरावही लाटांच्या मार्याने वाहून गेला.
पावसापूर्वीच्या धोकादायक भागाच्या दुरुस्तीच्या कामावेळी स्थानिकांना पतन विभागाने विश्वासात न घेतल्याने प्रचंड नाराजी आहे. त्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांनी नुकतीच पतन विभागाच्या अधिकार्यांची भेट घेतली. या भेटीमध्येही त्यांनी अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केलेले होते. ही कामे दर्जेदार व्हावी आणि शासनाचा अर्थात जनतेचा पैसा वाया जाऊ नये, अशी स्थानिकांची मागणी आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी 8 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.