
दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष अमित कदम यांचाही राजीनामा
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष उमेश कदम यांनी काही दिवसांपूर्वीच पदाचा राजीनामा दिलेला असतानाच याच गटाचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्षपदसह सदस्यत्वाचाही अमित कदम यांनीही तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.माजी आमदार कै. तु.बा. कदम यांचे सुपुत्र अमित कदम हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. तरूणांची भक्कम फळी उभी करून संघटना बळकटीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. याचमुळे त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या युवकच्या तालुकाध्यक्ष पदापासून सरचिटणीस पदासह जिल्हा पातळीवरील पदेही सोपवण्यात आली होती. या पदाच्या माध्यमातूनही त्यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाल्यानंतर दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष अमित कदम यांनी शरद पवार गटातच राहणे पसंत केले होते. www.konkantoday.com