
चमत्कार मागे विज्ञान किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते- अंनिसचे कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांचे प्रतिपादन
खेड : चमत्कार हे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या कसोटीवर तपासता येतात. चमत्कारा मागे विज्ञान किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी केले . अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा खेड व आय. सी. एस. महाविद्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड येथील आय. सी. एस. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे चमत्कार सत्यशोधक दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ते बोलत होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन गोवळकर म्हणाले की, चमत्कार कोणत्याही दैवी शक्तीने करता येत नाही. चमत्कार कधीच घडत नसतात तर ते घडविले जातात. भोदूबुवा, हे चमत्कार घडवून आणतात. यामागे कोणतीही दैवी शक्ती नसते. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव तपासणे. प्रत्येक कार्यामागील कार्यकारण भाव निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती व प्रयोग याद्वारे तपासता येतो. श्री. गोवळकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना उदाहरणासाहित समजावून सांगितला.
विज्ञान नेहमी नम्र असते. विज्ञान अंतिम सत्याचा दावा करत नाही. आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ ‘विज्ञानाच्या’ आधारे झालेली आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने दिलेल्या सगळ्या गोष्टी आपण वापरतो पण वैज्ञानिक दृष्टीकोन वापरत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पध्दती आहे. सत्यशोधनाचा मार्ग आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला हवं असे श्री.गोवळकर यांनी सांगितले.
२१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठी अफवा पसरवली होती, त्याचे उच्चाटन व प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्यशोधन करून हि निव्वळ अफवा आहे हे सिद्ध केले होते, त्या दिवसापासून महाराष्ट्र अंनिस २१ सप्टेबर हा दिवस “चमत्कार सत्यशोधन दिन “म्हणून साजरा करते. या निमित्ताने महाविद्यालयात चमत्कार सादरीकरण व त्यामागील विज्ञान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाखा कार्याध्यक्ष सचिन शिर्के यांनी समजावून सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या अंधश्रद्धा घडताना दिसतात. याकडे आपण चौकस बुद्धीने , विवेकी विचारणे पहायला हवं. आपल्या विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या बुवा, बाबा, महाराज यांच्यापासून होणारी फसवणूक व शोषण याबाबतचे प्रबोधन समाजात जाऊन करायला पाहिजे.
यावेळी शाखा कार्याध्यक्ष सचिन शिर्के महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व एन. सी. सी. कंपनी कमांडर डॉ. एच.पी.थोरात , विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. अयुब शेख , वरिष्ठ प्राध्यापक व एन. एस. एस कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस.पाटोळे , सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. आर. एस. भालेराव, अकाऊंट विभागाचे प्रमुख प्रा. केळकर सर, इतर सहकारी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल पाटील यांनी केले.