यमुनाबाई खेर ट्रस्ट, सर्वोदय छात्रालयाचा रविवारी अमृतमहोत्सव आस्था सोशल फाउंडेशनच्या सुरेखा पाथरे यांना श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार
*. रत्नागिरी : मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, पद्मविभूषण बाळ गंगाधर खेर यांनी स्थापन केलेल्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट आणि सर्वोदय छात्रालयाचा अमृत महोत्सवी सोहळा येत्या रविवारी (ता. २१) आयोजित केला आहे. सकाळी १०.३० वाजता दत्त मंगल कार्यालयात हा सोहळा होणार आहे. या वेळी आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे यांना ट्रस्टच्या वतीने श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मानपत्र, साडी चोळी आणि ५००० रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.अमृत महोत्सव सोहळ्याचे अध्यक्षस्थान खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते भूषणवार असून प्रमुख पाहुणे म्हणूने साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनिलकुमार लवटे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह उपस्थित राहणार आहेत. पद्मविभूषण खेर यांनी २२ मे १९४८ रोजी श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टची स्थापना केली. याकरिता कोकणचे गांधी व बाळासाहेबांचे मित्र अप्पासाहेब पटवर्धन यांनी सल्ला दिला होता. खेड्यापाड्यातून, गरीब, कष्टकरी वर्गातून शिक्षणासाठी रत्नागिरीत आलेल्या छात्रांना राहण्याकरिता १ एप्रिल १९४९ रोजी सर्वोदय छात्रालयाची सुरवात झाली. आजवर सुमारे १६०० विद्यार्थ्यांनी या छात्रालयाचा लाभ घेतला असून ते व्यक्तीगत जीवनात यशस्वी झाले.या कार्यक्रमात खेर ट्रस्टच्या वतीने आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे यांना श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी शिक्षणानंतर सोशल इंजिनियर्स संघटन संचालित आमराई आणि युनिसेफ या आस्थापनातील कामात प्रशिक्षक, मार्गदर्शक, सल्लागार म्हणून काम पाहिले. या भूमिकातून महिला, बालकल्याण यासाठी पायाभूत कामात सहभागी झाल्या. पुढे जालना जिल्हा परिषदेत सामाजिक शास्त्रज्ञ आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेत जलस्वराज्य प्रकल्पात महिला सक्षमीकरण अधिकारी अशा जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. मुलगा आल्हाद हा स्वमग्न असला तरी त्यासाठी आस्था सोशल फाऊंडेशनची स्थापना केली. दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन करण्याकरिता अनेक उपक्रम सुरू केले. ० ते ६ वयोगटासाठी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, ६ वर्षावरील मुलांसाठी थेरपी, वाचा उपचार व्यवसाय, भौतिक उपचार, विशेष प्रशिक्षण दिव्यांग वकिली केंद्र, दिव्यांगासाठी हेल्पलाईन, शासकीय परवाने-सवलतीचे उपचार व निधी मार्गदर्शन, कायदेशीर पालकत्त्व, सार्वजनिक वाहतूक सवलती अशा अनेक गोष्टींसाठी आस्था काम करत आहेत. या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड केली आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ट्रस्टचे अॅड. संदीप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, ट्रस्टी सोनवी देसाई आणि ट्रस्टी बाळकृष्ण शेलार तसेच खेर ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, उपाध्यक्ष जयश्री बर्वे, कार्यवाह नरेंद्र खानविलकर यांनी केले आहे.www.konkantoday.com