डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ संपन्न
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील दीक्षांत समारंभप्रसंगी डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करताना आपल्या हातून पर्यावरणाचा ऱ्हास न होता शाश्वत विकास कसा साधला जाईल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी केले. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांच्या दीक्षांत (पदवीदान) समारंभप्रसंगी बोलत होते. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या २२व्या पदवीधर तुकडीचा पदवीदान समारंभ डॉ. कद्रेकर यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. बहुसंख्य स्नातक, पालक, विभागप्रमुख व प्राध्यापक या प्रसंगी उपस्थित होते. महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी यांनी प्रस्तावना केली. महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९७.०२ टक्के लागला असून, आजपर्यंत इंजिनिअरिंगमधून ५ हजार ३७५ विद्यार्थी तर एमएमएस शाखेतून ४२५ विद्यार्थी बाहेर पडले. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करताना त्यांनी माजी विद्यार्थी या नात्याने विद्यार्थ्यांनी समाजाबरोबरच आपल्या महाविद्यालयाच्याही विकासासाठी योगदान द्यावे, असे सांगितले. www.konkantoday. com