अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन मिळाले.. पण नेटवर्कची अडचण
रत्नागिरी जिल्ह्यातील ३ हजार ६७ अंगणवाडी सेविकांना शासनाकडून प्राप्त झालेले स्मार्ट मोबाईल वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे या मोबाईलद्वारे जि.प. महिला बालकल्याण विभागाचा कारभार गतीमान होईल, असे म्हटले जात होते. पण जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामीण भाग हा डोंगराळ व दुर्गम असल्याने त्या मोबाईलवर अनेक ठिकाणी नेटवर्कच्या अडथळ्यामुळे काम करणे मुश्किल बनले आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात जवळपास ३ हजार अंगणवाड्या कार्यरत आहेत. प्रत्येक गावात अंगणवाड्यांचे कामकाज चालते. मोठ्या अंगणवाड्यांच्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. तर मिनी अंगणवाडीत सेविका हे एकच पद आहे. तसेच सेविकांकडून अनेक शासकीय कामे केली जात असून त्या कामांची नोंद मोबाईलवरी ऍपवरून केली जाते. बालकांचे वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी उपस्थिती आदी प्रकारची माहिती भरण्यात येते. मात्र यापूर्वी देण्यात आलेल्या मोबाईलच्या निकृष्ट दर्जामुळे त्याद्वारे अंगणवाडी सेविकांना कामकाज नेहमीची माहिती विभागाच्या अधिकार्यांमार्फत पोचविण्याची समस्या निर्माण झाली होती. त्या मोबाईलवर कोणतीच माहिती भरता येत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी पूर्वीचे मोबाईल महिला व बालकल्याण विभागाकडे परत केले होते. तर त्यासाठी काही महिन्यापूर्वी कामबंद आंदोलनही करण्यात आले होते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे काम ठप्प होते. नवा स्मार्ट फोन दिल्याानंतर हे काम सुरू करण्यात येईल, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला होता. त्यामुळे शासनाने आता स्मार्ट मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना या मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे.www.konkantoday.com