शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये
शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असा सल्ला शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांनी दिला आहे. भरणे येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सूर्यकांत दळवी यांनी नुकतीच आ. योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर बोचरी टीका केली. त्या टीकेचा समाचार चव्हाण यांनी घेतला. चव्हाण म्हणाले की, आ.योगेश कदम हे दापोलीतील महायुतीचे आमदार आहेत. पाच वेळा शिवसैनिकांच्या मतावर आमदार झालेल्यांनी शिवसेना आमदाराचे पार्सल पाठवण्याचे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाबाबत स्थानिक नेत्यांनी जपून बोलण्याचे भान दळवी यांना नाही. केंद्रात मोदींचे हात बळकट करण्यासाठी आ.योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे भाजपला सत्तेचे फळ चाखायला मिळत आहे, हे विसरू नये. रामदास कदम हे स्पष्ट वक्ते आहेत. पोटात एक व ओठात एक त्यांना जमत नाही. बंड करून भाजपला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे शिवसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा विश्वासघात होता कामा नये.www.konkantoday.com