
शेतकर्यांना देय असलेली विम्याची सुमारे 125 कोटींची रक्कम लवकरच शेतकर्यांना विमा कंपन्यांकडून वितरित होणार
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील राज्य सरकारच्या हिश्श्यांची सुमारे 52 कोटी 66 लाख रुपयांचा विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपन्यांना देण्यात आली आहे.मागील तीन हंगामातील आंबिया बहारातील ही रक्कम विमा कंपन्यांना मिळाल्याने थकीत देय असलेली विम्याची सुमारे 125 कोटींची फळपीक विमा नुकसानभरपाई शेतकर्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऐन दुष्काळी स्थितीत ही रक्कम मिळाल्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.शेतकर्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यास मदत होते. त्यासाठी राज्यसरकारच्या वतीने प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे.राज्यात सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या तीन वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष , प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई (आंबिया बहार) या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यात येत आहे. मागील तीन आंबिया बहार व एक मृग बहारातील फळपीक विम्याची रक्कम शेतकर्यांना देणे बाकी होते.राज्य सरकारने विमा कंपन्यांना योजनेपोटी द्यावयाचा 52.66 कोटी रुपयांचा विमा हप्ता नुकताच दिलेला आहे. त्यामुळे 1 लाख 97 हजार 565 शेतकर्यांना देय असलेली विम्याची सुमारे 125 कोटींची रक्कम लवकरच शेतकर्यांना विमा कंपन्यांकडून वितरित होणे अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.www.konkantoday.com