
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच डॉक्टरांचा दबाव गट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच डॉक्टरांचा दबाव गट निर्माण होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर.व्ही. अशोकन यांनी याबाबत थेट भूमिका घेतली आहे.विविध उद्योग क्षेत्रांतील संघटना त्यांचा दबाव गट तयार करून सरकारकडून मागण्या मान्य करून घेत असतात. याचबरोबर उद्योगासाठी अनुकूल सरकारी धोरणाचा आग्रह धरतात. याचेच अनुकरण आता डॉक्टरांनी करावयाचे ठरविले आहे. भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३०४ (अ) नुसार वैद्यकीय निष्काळजीच्या प्रकरणात डॉक्टरांना पूर्वी दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. आता भारतीय न्याय संहितेच्या कलम २६ अंतर्गत हा गुन्हा येतो. त्यात शिक्षेची तरतूद ५ वर्षे करण्यात आली. डॉक्टरांनी याला विरोध केल्यानंतर डॉक्टरांसाठी शिक्षेची तरतूद पुन्हा २ वर्षे करण्याची घोषणा सरकारने केली. या प्रकरणानंतर आपल्या हक्कासाठी वेळीच आवाज उठविण्याची भूमिका डॉक्टरांकडून मांडण्यात आली. आता इंडियन मेडिकल असोसिएशनने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दिशेने पाऊल उचलले आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनची प्रत्येक शाखा त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांपर्यंत पोहोचणार आहे. उमेदवारांसमोर डॉक्टरांच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत. www.konkantoday.com