नादाला लागू नका, अवघड जाईल -ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा विरोधकांना इशारा
मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पठ्ठ्या आहे. त्यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. ज्येष्ठांचा आदर, भजन-कीर्तन ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. तिचा मला अभिमान आहे. त्यामुळे नारायण राणे तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुमचा पंचनामा करण्यास सुरूवात केली तर अवघड होईल, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी येथे इंडिया आघाडीच्या निर्धार मेळाव्यात राणेंना दिला.कापसाळ येथील माटे सभागृहात आघाडीचे उमेदवार राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजित निर्धार मेळाव्यात उपस्थित सर्वच स्थानिक नेत्यांनी संविधान, भाजप हटावचा नारा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी खासदार राऊत यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवितानाच राणे पिता-पुत्रांवर टीका केली.ते पुढे म्हणाले की, २०१४ साली मी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी कोकणात हीच राडा विकृती हैदोस घालत होती. मात्र कोकणी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. दोनवेळा त्यांना अद्दल घडविल्यानंतरही पुन्हा खुमखुमी आली आहे.www.konkantoday.com