
आगामी निवडणुकांमध्ये लाखो शिवसैनिक पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत- शरद पवार
शरद पवारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाचा मेळावा आयोजित केला आणि पवार गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर निशाणा साधला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते मंत्रालयात जात नव्हते. ते मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले हे आमच्या पचनी पडले नव्हते, अशी कबुली पवारांनी मध्यंतरी दिली होती. त्याचा उल्लेख त्यांनी विस्तारित आत्मचरित्रात देखील केला होता.पण बारामतीतल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात मात्र पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर अफाट स्तुतिसुमने उधळली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावर अभूतपूर्व संकट आले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी 18 – 18 तास काम करून महाराष्ट्राचे संकट निवारले, असा दावा पवारांनी केला. शिवसेना हा राष्ट्रनिष्ठ पक्ष आहे. राष्ट्रावर संकट आले की शिवसेना पेटून उठते हे बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून आपण पाहिले आहे, काही लोकांनी त्यांचा पक्ष फोडला. पण त्यांना हे माहिती नाही की पक्ष फोडून नेते बाहेर पडले. शिवसैनिक शिवसेनेतच राहिले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये लाखो शिवसैनिक पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा पवारांनी दिला.पक्ष फोडणाऱ्यांना शिवसेनेत जागा दाखवून देतील असे पवार म्हणाले खरे पण स्वतः पवारांनीच 1992 मध्ये शिवसेना फोडली होती शिवसेनेतून बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक छगन भुजबळ यांच्यासह 18 आमदारांना फोडले होते, हे मात्र पवार सोयीस्कररित्या विसरले. त्यांनी आजच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीला देखील उजाळा दिला.www.konkantoday.com