
विनापरवाना लॉटरी प्रकरणी वैभव खेडेकरांच्या अडचणीत वाढ बुधवार रात्रीपासून पोलीस घेत आहेत वैभव खेडेकर यांचा शोध,मनसेचे काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
खेड : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान विनापरवाना लॉटरीची सोडत काढून विजेत्यांना बक्षिस वाटल्यापारकरणी मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी वैभव खेडेकर यांना अटक करण्याची तयारी केली आहे. बुधवारी रात्रीपासून पोलीस वैभव खेडेकर यांचा शोध घेत आहेत यासाठी पोलिसांनी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
राजवैभव प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी खेड शहरात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. या उत्सवांदरमायन भाविकांमध्ये लॉटरीची तिकीटे वाटून नशीबवान भाविकाला वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. यामध्ये मोटारसायकल, फ्रिज, ओव्हन, प्रेमसुरे कुकर, अशा प्रकारच्या बक्षिसांचा समावेश असतो. करोनाची मागील दोन वर्षे वागतलेली तर हा उपक्रम सुरु आहे.
यावर्षी कोरोनाची भीती संपली असल्याने या वर्षी गणेशोत्सवामध्ये लॉटरी योजना राबविण्यात आली. यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यावर नशीबवान भाविकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आलेलया नवरात्रोत्सवामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गरबा रास नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत विजयी होणाऱ्या सार्धकांना प्रथम क्रमांकासाठी गुवाहाटी सहल, द्वितीय क्रमांकासाठी गुजरात आणि तृतीय क्रमांकासाठी गोव्याची सहल अशी बक्षिसे ठेवण्यात आले. या बक्षिसांचे बॅनर झळकल्यानंतर खेडमध्ये मनसेच्या या स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु झाली.
दरम्यान मानवाधिकार पत्रकार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनसेचे वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिसात तक्रार दाखल केली. धर्मादाय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी न घेता वैभव खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनधिकृत लॉटरी काढून अवैध रित्या पैसे जमा केले. बोगस पावत्या देऊन खेड शहरातील व्यापारी, नागरिक यांच्याकडून देणग्या गोळ्या केल्या.आणि या पैश्यातून बक्षिसं वाटली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदाराने केली होती.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून लकी लॉटरीच्या माध्यमातून वाटण्यात आलेली बक्षिसं जप्त केली होती. आता हे प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले असून गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी कालपासून वैभव खेडेकर यांचा शोध घेत आहेत. या दरम्यान मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसानी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून वैभव खेडेकर यांच्या ठाव ठिकाणाबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी अटकेची तयारी करताच वैभव खेडेकर यांच्या वकिलांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जमीन न मिळाल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.