
गुहागरमध्ये एसटी फेर्या वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
गुहागर : आगारातून टायर व अन्य साहित्याची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील सेवा सुरळीत झालेली नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. या संदर्भात काँग्रेस तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर व काही पालकांनी गुहागर आगारप्रमुखांची भेट घेत व्यथा मांडल्या. टायर आणि अन्य साहित्याची कमी आहे. यामुळे 25 हून अधिक गाड्या बंद आहेत. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. पास काढूनही विद्यार्थ्यांना भर पावसात पायपीट करावी लागते. काहींना खासगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागत आहे. रानवी येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये गुहागरमधील सुमारे 35 ते 40 विद्यार्थी जातात. त्यांची शाळा दुपारी 2 वा. सुटते. या विद्यार्थ्यांना पुन्हा गुहागरला येण्यासाठी असलेली बस गेले तीन दिवस सायंकाळी 4 वाजल्यानंतर गुहागरला आली. त्यामुळे संतापलेल्या महिला पालकांनी आगार व्यवस्थापक वैभव पवार यांची भेट घेतली. काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर यांनीही आगार व्यवस्थापकांना बंद असलेल्या ग्रामीण भागातील फेर्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे सांगितले. फेर्या सुरू करण्याबाबत निवेदन दिले. आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आगारप्रमुख पवार यांनी
सांगितले.