दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचे आकस्मिक निधन तरीदेखील दोघींनी दिली दहावीच्या परीक्षेचा पेपर
दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचे शुक्रवारी (२२ मार्च) रात्री आकस्मिक निधन झाले. दुसऱ्या दिवशी इतिहासाचा पेपर हाेता. एकीकडे दु:खाचा डाेंगर हाेता तर दुसरीकडे शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा हाेता.अचानक समाेर आलेल्या या संकटाने दाेघीही हादरल्या. तरीही घरात वडिलांचा मृतदेह ठेवून दाेघींनी दुसऱ्या दिवशी परीक्षाही दिली. ही घटना रांगव कुंभारवाडी (ता. संगमेश्वर) येथील आहे.तन्वी व जान्हवी दीपक कुंभार या जुळ्या बहिणी दहावीला आहेत. इतिहासाचा पेपर असल्याने दोघी २२ राेजी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या. अभ्यास पूर्ण होताच झोपण्याची तयारी सुरू असतानाच वडील दीपक कुंभार (४२) यांच्या छातीत दुखू लागले, त्यांना श्वास घ्यायला अडचण येऊ लागली. इतरांच्या मदतीने रात्रीच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्याेत मालवली आणि दाेघींसमाेर संकट उभे राहिले.वाडीतील काही जाणकार मंडळींनी त्यांना विश्वासात घेऊन पेपरला जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी केली. काकी व इतर व्यक्तींना सोबत घेऊन त्या कडवईतील भाईशा घोसाळकर हायस्कूल केंद्रावर परीक्षेसाठी आल्या. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते, रडून आवाज क्षीण झाला होता. अशा मन:स्थितीत चार किलोमीटर प्रवास करून त्यांनी इतिहासाचा पेपर दिला.www.konkantoday.com