
वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणकडून तेराशे थकित वीज ग्राहकांना शॉक
आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांना वारंवार नोटीस देवूनही न जुमानणार्या १ हजार ३१५ वीज बिल थकबाकीदारांची कायमची विद्युत कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे.मार्च महिना संपत आला तरी अजूनही महावितरणची थकबाकी मोठी आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी महावितरण कंपनीकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. वीजबिल भरण्यासाठी थकबाकीदारांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत. त्या सूचनांना न जुमानणार्या ग्राहकांविरोधात कठोर कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा ग्राहकांची वीज कनेक्शन कायमची तोडली जात आहेत. या ग्राहकांना त्या कारवाईमुळे पुढील ६ महिने कंपनी वीज जोडणी न देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानंतर त्या ग्राहकांना नवीन जोडणीसाठीच अर्ज करावा लागणार असून त्यानंतर वीज कनेक्शन मिळणार आहे. त्याचप्रमाणे महावितरणकडून थकबाकीदार ३९५ वीज ग्राहकांची तात्पुरती वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्या वीज ग्राहकांना थकीत बील भरल्यानंतर त्यांना पुन्हा वीज जोडून दिली जाणार आहे. मार्च महिना संपत आला तरी अजूनही वीजबिल थकबाकी मोठी आहे. जिल्ह्यात अजूनही २७ हजार ३७९ ग्राहकांकडून १३ कोटी ९२ लाख थकबाकी आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जोरदार वसुलीमोहीम हाती घेण्यात आली आहे. www.konkantoday.com