मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ.भूषण गगराणी यांनी पदभार स्वीकारला,नवी मुंबई आयुक्तपदी डाॅ. कैलास शिंदे यांची नियुक्ती
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेत नव्या आयुक्तांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही पालिकेत बुधवारी नूतन आयुक्तांनी पदभार स्वीकारला.मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ.भूषण गगराणी यांनी पदभार स्वीकारला. नवी मुंबई आयुक्तपदी डाॅ. कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते गुरुवारी पदभार स्वीकारतील . डॉ. शिंदे हे तत्पूर्वी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. मुंबई महापालिकेत दोन नव्या अतिरिक्त आयुक्तांचीही नियुक्ती झाली असून या दोघांनीही बुधवारी पदभार स्वीकारला. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. आयोगाच्या आदेशानुसार नव्या नियुक्त्या झाल्या आहेत.
मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेले भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आणि एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी या तिघांची नावे आयोगाला पाठवली होती. त्यानंतर गगराणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबई महापालिकेतील अश्विनी भिडे आणि पी.वेलरासू या दोन अतिरिक्त आयुक्तांच्या पदावर अनुक्रमे डॉ. अमित सैनी व अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात अली आहे. डॉ.गगराणी यांनी मावळते आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडून पदभार स्वीकारला.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सह आयुक्त (विशेष) रमेश पवार, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे आदींसह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com