रत्नागिरीतील वाहतुकीच्या गैरसोयीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी शहरातील सर्वच रस्त्यांचे मजबुतीकरण सध्या सुरू आहे. काही भागातील काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. ते काम संपूर्ण झाल्यानंतर नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा मिळेल, यात कोणतीही शंका नाही, मात्र सध्या हे काम सुरू असताना नागरिकांना, वाहनचालकांना, पादचार्यांना खूपच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडे आल्या आहेत.रत्नागिरी शहरात रस्त्यांचे मजबुतीकरण सुरू आहे. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम केले जात आहे. त्यासाठी नेहमीची वाहतूक सोयीनुसार वळविली जात आहे. पण ते करत असताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. रत्नागिरी पालिका आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेने याकडे लक्ष द्यायला हवे होते. पण त्याबाबतीत साफ दुर्लक्ष झाले आहे. कॉंक्रिटीकरण वेगवेगळ्या टप्प्यात होत आहे. हे काम जेथे जोडले आहे तेथे खड्डे आहेत. त्यावरून वाहतूक सुरू आहे. दुचाकी वाहनांना त्याची कोणतीच सूचना मिळत नसल्यामुळे वेगाने आलेली वाहने त्या खड्ड्यात आदळत आहेत. त्यामुळे छोटे मोठे अपघात अनेक ठिकाणी होत आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक वळविल्याच्या ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. ही खडी दुचाकीचालकांना फारच त्रासदायक ठरत आहे. रस्त्याच्या डावीकडच्या किंवा उजवीकडच्या भागाचे काँक्रिटीकरण झाले असेल तर तो भाग दुसऱ्या भागाच्या तुलनेत उंच झाला आहे. ते साहजिक असले तरी वाहनचालकांना त्याबाबतची सूचना मोठ्या फलकांद्वारे देणे आवश्यक आहे. तशी ती दिली जात नाही. त्यामुळे एक तर वाहनचालकांना मोठा हेलपाटा पडतो. शिवाय वाहतुकीच्या नियमांचे कोणतेही पालन न करता वाहने उलट्या सुलट्या दिशेने चालविली जात आहेत. योग्य सूचना ठळकपणे लिहिल्या गेल्या नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे वाहने उलटी सुलटी चालविली जातात. दररोज वेगवेगळ्या टप्प्यात काम होत असल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याची ठिकाणेही सातत्याने बदलत आहेत. त्याबाबत एक तर मोठे सूचना फलक लावणे आवश्यक आहे किंवा त्या ठिकाणी रात्रंदिवस वाहतूक पोलिसांची व्यवस्था करणे जरुरीचे आहे. रस्ते जोडल्याच्या ठिकाणी पसरलेली खडी वाहतुकीला त्रासदायक असल्याचे संबंधित ठेकेदाराला समजावून सांगितले गेले पाहिजे. वाहतूक पोलीस आणि रत्नागिरी पालिकेने याबाबत बारकाईने लक्ष घातले पाहिजे.निर्धोक आणि सुरळित रस्ते हा ग्राहकांचा हक्क आहे. तो सध्या पोलीस आणि पालिकेकडून दुर्लक्षिला जात आहे. याकडे यानिमित्ताने आवर्जून लक्ष वेधत असून योग्य ती कार्यवाही तातडीने व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी आणि जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.अध्यक्ष संदेश सावंत आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी ही निवेदने दिली.दरम्यान, रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले.