कै. जनुभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे अनावरण
_चिपळूण :: लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या जांभेकर सभागृहातील वातावरण सकारात्मक आहे. सभागृहाचे कोंदण काहीतरी आपल्याला सांगू पाहाते आहे. इथल्या कलादालनाचा अनुभवलेला हा प्रवास खूप छान आहे. स्वदेश हितचिंतक नाटक मंडळींचे मालक आणि दिग्दर्शक कै. जनुभाऊ निमकर यांचे तैलचित्र अतिशय देखणे आहे. त्या काळात एखादी संपूर्ण नाट्य संस्था स्वत:च्या खांद्यावर धारण करणारे डोळे या तैलचित्रात दाखवल्याप्रमाणेच असू शकतात, असा विश्वास देणारे हे तैलचित्र असल्याचे प्रतिपादन नामवंत अभिनेत्री संपदा कुळकर्णी-जोगळेकर यांनी केले.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सभागृहात नुकतेच, ‘संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांना रंगभूमीवर आणणारे ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’ चे मालक व दिग्दर्शक ‘अपरान्तपुत्र’ कै. जनुभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे अनावरण नामवंत अभिनेत्री संपदा कुळकर्णी-जोगळेकर आणि जागतिक देवरूखे ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष राहिलेले सामाजिक क्षेत्रात अग्रेसर प्रथितयश डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्याहस्ते झाले त्यावेळी संपदा कुळकर्णी-जोगळेकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, माधव भोळे, माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, नामवंत चित्रकार गणेश कळसकर उपस्थित होते. वाचनालयाच्या प्रथेप्रमाणे यावेळी उपरणे, ग्रंथभेट आणि श्रीफळ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. चंद्रशेखर निमकर म्हणाले, एका नात्याने जनुभाऊ निमकर हे आपले आजोबा होते. कोकणातील महनीय रत्नांचा दुर्मीळ आणि दुर्लक्षित इतिहास वाचनालयाने संग्रहित केला आहे. भविष्यात तो ध्वनिमुद्रित माध्यमात आणण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले. गणेश कळसकर यांनी तैलचित्र निर्मितीची कहाणी उपस्थितांना सांगितली.इतिहासाचे व्यासंगी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी जनुभाऊ निमकर यांच्याविषयी बोलताना, त्याकाळी सामान्य घरातील माणसं नाटकात मोठी झाल्याचे नमूद केले. देशपांडे यांनी ‘संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांच्या जडणघडणीतील जनुभाऊंच्या योगदानाची विस्तृत माहिती दिली. यावेळी अरविंद कोकजे, माधव भोळे, उमेश कुळकर्णी, सुरेंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा दामले यांनी केले. कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.www.konkantoday.com