आता खेड येथून कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा
रत्नागिरी पाठोपाठ आता खेड येथून कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. गुरूवारी खेड रेल्वेस्थानकावरून ८ कंटेनर रवाना झाले. खेड ते जवाहरलाल नेहरू (जेएनपीटी) पोर्ट अशी ही खेडवरून सुटलेली पहिली मालगाडी रवाना झाली. खेड तालुक्यातील लोटे आणि चिपळूण येथील औद्योगिक वसहतीतून उत्पादित मालाची परदेशात निर्यात करणे शक्य झाले आहे.कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकण रेल्वे प्रशासन, कॉनकोर यांच्या अथक प्रयत्नातून कोकणातील उत्पादित माल अधिक सोयीस्कर, जलद आणि किफायतशीरपणे वाहतूक व्हावा यासाठी रेल्वे मालभाडे ग्राहक यांना सुविधा उभारणीसाठी गती देण्यात आली आहे. गुरूवारी कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावर रेल्वे कंटेनर मालगाडीच्या प्रारंभावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे, विभागीय वरिष्ठ यातायात प्रबंधक दिलीप भट, कॉनकॉरचे राजन साळुंखे, हर्षवर्धन, नितीन चव्हाण, खेड येथील कंटेनर डेपोचे सेसा लॉजिस्टचे सिद्धाराम आंब्रे, सागर आंब्रे, कृष्णा अँटिऑक्सिड कंपनीचे पाटील आदी उपस्थित होते. ‘कॉनकॉर’ने या आधी रत्नागिरी येथे ही कंटेनर रेल्वे वाहतूक व्यवस्था केली आहे. रत्नागिरी येथून सागरी मासे, हापूस आंबा प्रक्रिया केलेला माल कोकण रेल्वेच्या माध्यमातून परदेशात निर्यात होत आहे. खेडमधून सुरू झालेल्या माल वाहतुकीमुळे होणारे फायदे स्पष्ट करण्यात आले. कोकण रेल्वेने व्यापारवृद्धीसाठी खेड आणि रत्नागिरी येथे मुलभूत सुविधा दिल्या आहेत. यात गोदाम, शीतगृह अशा विविध सुविधांचा समावेश आहे. www.konkantoday.com