कुणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला ही माहितीही समोर येणार , सर्वोच्च न्यायालयाने SBIला बजावली नोटीस
गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या निवडणूक रोख्यांचा तपशील अखेर निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. या तपशीलामध्ये कुणी किती रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले, याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या व्यक्तीने वा कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी दिला, याची माहिती मात्र समोर येऊ शकली नव्हती. आता यासंदर्भात महत्त्वाचा घटक असणारा निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक जाहीर करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला नोटीस जारी केली आहे.एसबीआयनं दिलेली माहिती निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेनं सर्व निवडणूक रोख्यांचे विशेष क्रमांक जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने यासंदर्भात एसबीआयला विशेष क्रमांक जाहीर करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांसंदर्भातली सर्वोच्च न्यायालयाच्या ताब्यात दिलेली सीलबंद माहिती आयोगाला पुन्हा देण्याचीही न्यायालयाने यावेळी परवानगी दिली.SBI कडून माहिती जाहीर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली तेव्हाच प्रत्येक निवडणूक रोख्याला देण्यात आलेल्या विशेष क्रमांकावरही युक्तिवाद झाला. कुणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला, हे समजण्यासाठी हा विशेष क्रमांक महत्त्वाचा दुवा आहे. सध्या एसबीआयनं जाहीर केलेली माहिती दोन प्रकारांमध्ये विभागलेली आहे. कुणी किती रकमेचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती रकमेचे निवडणूक रोखे मिळाले या प्रकारची वेगवेगळी माहिती सध्या एसबीआयनं जाहीर केली असून प्रत्येक निवडणूक रोख्यांना असणाऱ्या या विशेष क्रमांकाच्या मदतीने कुणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला, हे स्पष्ट होऊ शकणार आहे!www.konkantoday.com