
या प्रजातीचे कुत्रे पाळणे धोकादायक !! केंद्र सरकारने दिला राज्यांना बंदी घालण्याचा सल्ला
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. या हल्ल्यात अनेकांनी प्राण देखील गमावले आहेत. पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जखमी देखील झाले आहेत. पिटबुल, रॉटविलर या सारखी कुत्री ही धोकादायक असतात. कुत्र्यांचे हे हल्ले रोखण्यासाठी आता केंद्र सरकार मोठी पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. कुत्र्यांच्या काही प्रजातींची आयात, प्रजनन व खरेदी यावर निर्बंध लादण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना केल्या आहेत. पिटबुल, रॉटविलर, टेरियर, वुल्फ डॉग आणि मॅस्टिफस अशा कुत्र्यांच्या प्रजातींचा यात समावेश करण्यात आला आहे.जगात मोठ्या प्रमाणात श्वान प्रेमी आहेत. या श्वान प्रेमींकडून विविध जातीची कुत्री पाळली जातात. भारतात देखील या प्रकरची कुत्री पाळली जातात. काही वेळा तर परदेशी जातींची कुत्री ही आयात देखील केली जाते. मात्र, यातील काही प्रजाती या हिंस्त्र असल्याने त्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी आणि मृत्यूमुखी देखील पडले आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका वृद्ध महिलेचा घरातील कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पाळीव पिटबुलने या महिलेला चावा घेतला होता. या घटना वाढत असल्यामुळे सरकारने या मुद्द्यावर मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पिटबुल, रॉटवेलर, टेरियर, वुल्फ डॉग, मास्टिफ या परदेशी जातीच्या कुत्र्यांच्या आयात, प्रजनन आणि विक्रीवर बंदी घालावी, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे.www.konkantoday.com