हनुमानाने लावला अंदमान बेटाचा शोध – आफळेबुवा
रत्नागिरी : भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अंदमान बेटाचा शोध महारुद्र हनुमानाने लावला. त्यावरूनच त्या बेटाचे पूर्वीचे नाव हंदुमान होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रामायणातील किष्किंधा कांड आणि सुंदर कांडातील कथा आफळेबुवांनी सांगितल्या. सीतेच्या शोधासाठी हनुमानाने केलेला लंकेचा प्रवास, तेथील व्यवस्था, रावणाचा दरबार, दारूची कोठारे, सैन्य दल अशा सर्व भागांची पाहणी हनुमानाने केली. संभाव्य युद्धाकरिता लंकेत छावण्या करायला रावणाकडून नकार आला, तर पर्याय म्हणून परिसरातील बेटांची पाहणीही हनुमानाने केली. त्याच वेळी तो लंकेपासून जवळच असलेल्या अंदमान बेटावर पोहोचला. अंदमान बेटाच्या माहितीपटात हंदुमान असा उल्लेख आहे, असे बुवांनी सांगितले. गीतरामायणातील गीतांचे गायन आणि त्यावरील विवेचन अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. समारंभात नारदीय कीर्तन परंपरेतील अग्रणी श्रीपाद बुवा ढोल्ये, पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा यावेळी बुवांच्या हस्ते कीर्तनसंध्या परिवारातर्फे सन्मान करण्यात आला.यावेळी गीतरामायणातील धन्य मी शबरी श्रीरामा, मी धर्माचे केले पालन, तरुन जो जाईल सिंधू महान आणि मज सांग अवस्था दूता रघुनाथाची ही गीते अभिजित पंचभाई यांनी गायिली. त्यांना प्रसाद करंबेळकर (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हरेश केळकर, वज्रांग आफळे (तालवाद्य), सावनी नाटेकर (गायन) यांनी साथ केली.दरम्यान, कीर्तनसंध्या महोत्सवाचा एक दिवस वाढविण्यात आला असून आता १३ मार्चऐवजी १४ मार्च रोजी महोत्सवाचा समारोप होणार आहे.