मालगुंड प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 13 : मालगुंड येथे प्राणीसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कोणीही बेरोजगार राहणार नाही. नागरिकांच्या संपूर्ण शंकांचे निरसन करुनच हा प्रकल्प करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधुरत्न समृध्दी योजनेच्या विशेष निधीतून मालगुंड येथे प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यात प्राणी संग्रहालय व्हावे, ही आपली 2004 पासूनची इच्छा पूर्ण होत असल्याने आनंद होत आहे. यासाठी आपण मंत्री असलेल्या विभागाच्या माध्यमातून प्राणी संग्रहालयासाठी 74 कोटी निधी मंजूर असून, सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून 8 कोटी एवढा निधी प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधण्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली. आरे वारे, गणपतीपुळे, मल्टीमीडिया शो बरोबरच प्राणी संग्रहालय झाल्याने येथे पर्यटकांमध्ये वाढ होईल. त्याबरोबरच येथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन येथील कोणीही बेरोजगार राहणार नाही. वर्षाचे 365 दिवस येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. येथील भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल. या प्राणी संग्रहालयासाठी माफक दरामध्ये जमीन दिलेल्या जमीन मालकांचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी आभार मानले. ते पुढे म्हणाले, तुमच्यापेक्षा तुमची मला जास्त काळजी आहे. या प्रकल्पामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही. येथील नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करुनच येथे सुसज्ज असे प्राणी संग्रहालय उभे राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. *वन विभागाला दोन बोलेरो पिकअप वाहनांचे हस्तांतरण* वन्यप्राणी व्यवस्थापन योजनेंतर्गत डीपीसीच्या निधीतून घेण्यात आलेल्या दोन बोलेरो पिकअप वाहनांचे वितरण पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते विभागीय वन अधिकारी श्री. खाडे यांना करण्यात आले. यावेळी सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी श्री. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारीश्री. पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार आदी उपस्थित होते.www.konkantoday.com