कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक येत्या १० जूनपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत अमलात येणार

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. आवश्यक ती पाहणी, दुरुस्ती आणि जरुरीनुसार सुरक्षेसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कोलाड (रायगड) ते ठोकूर (कर्नाटक) या दोन टोकांना जोडणारा ७४० किलोमीटरचा मार्ग कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येतो. दरवर्षी कोकणात मोठा पाऊस पडत असल्याने मार्गावरच्या सुरक्षेबाबत सतत सतर्क राहावे लागते. त्यासाठी दरवर्षीप्रमाणेच उपाययोजना करण्यात आली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गेली काही वर्षे खबरदारी घेतली जात असल्याने मार्गावर दरड कोसळण्याचे किंवा जमीन खचण्याचे प्रमाण अलीकडे कमी झाले आहे.त्यामुळे गेल्या सात वर्षांत पावसाळ्यात दरडी कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्याची वेळ कोकण रेल्वेवर आलेली नाही. तरीही दरवर्षीप्रमाणे उपाययोजना सुरू आहे. मार्गावर पावसाळ्यात सतत गस्त घालण्यासाठी ९७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणी २४ तास गस्त घातली जाणार आहे. दरड दूर करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्रीही सज्ज ठेवण्यात आली आहे. अतिवृष्टी सुरू असताना गाड्यांचा वेग ताशी ४० किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणीबाणीच्या काळात उपयोगी ठरावी, यासाठी रत्नागिरी आणि वेर्णा स्थानकांवर आपत्ती निवारण वैद्यकीय व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीच्या वेळी स्थानके आणि कार्यालयांशी संपर्क साधता यावा, यासाठी मोबाइल तसेच वॉकी-टॉकी सेट देण्यात आले आहेत. माणगाव, बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष दररोज २४ तास कार्यरत राहणार आहे.
पावसाळी वेळापत्रक येत्या १० जूनपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत अमलात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button