राज्यातील ३०० व्यक्ती, ९३ संस्थाचा गौरव होणार, सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांचे उद्या मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण
मुंबई, दि.११ : राज्यातील ३०० व्यक्ती व ९३ संस्थाचा राज्य शासनाच्या वतीने उद्या दि. १२ मार्च रोजी विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21,2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे.राज्यातील एकूण 393 पुरस्कारार्थ्यांची निवड या चार वर्षाचे पुरस्काराकरीता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 300 व्यक्ती व 93 संस्थांचा समावेश आहे. मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मींग आर्टस, जमशेद भाभा नाटयगृह, एनसीपीए मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई येथे उद्या दिनांक 12 मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता वितरण सोहळा संपन्न होत आहे.राज्यात समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मुलन , जनजागरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराच्या निमित्ताने गौरव शासनाचे वतीने करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com