
संसदेत ४०० पार रामभक्त निवडून द्यावेत : चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : आगामी निवडणुकीत संसदेत ४०० पार रामभक्त निवडून देण्याचे शिवधनुष्य रामभक्तांनी उचलले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात आले रामराज्य या विषयावरील आगळावेगळा कार्यक्रम शनिवारी (दि. ९ मार्च) सुरू झाला. गीतरामायणातील निवडक २४ गीतांचे सादरीकरण आणि त्यावर विवेचन असे यावेळच्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे स्वरूप आहे. पहिल्या दिवशी गीतरामायणातील स्वये श्री रामप्रभू ऐकती, शरयूतीरावरी अयोध्या, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला ग सखे, मार ही त्राटिका रामचंद्रा आणि आकाशाशी जडले नाते ही सहा गीते सादर करण्यात आली. गीतरामायणाचे गायन अभिजित पंचभाई यांनी केले. त्यांना प्रसाद करंबेळकर (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हरेश केळकर, वज्रांग आफळे (तालवाद्य), सावनी नाटेकर (गायन) यांनी साथ केली. प्रत्येक गीतानंतर गीतानंतर त्याबाबतचे विवेचन आफळेबुवांनी केले.मार ही त्राटिका रामचंद्र या गीताविषयी विवेचन करताना आफळे बुवा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी सखोल अभ्यास करून सरकारला काही कायद्यांमध्ये कोणते बदल व्हायला हवेत, ते सुचविले आहे. सध्या असलेल्या कायद्यांनुसार एखाद्याने दुसऱ्यावर चोर असल्याचा आरोप केला, तर आपण चोर नसल्याचे आरोप झालेल्याला सिद्ध करावे लागते. वास्तविक तो चोर असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करण्यावरच सोपवली पाहिजे. आरोप सिद्ध झाला नाही तर त्याला सहा वर्षांपर्यंतचा कारावास झाला पाहिजे, अशी तरतूद कायद्यात होणे आवश्यक आहे. कारण चोर म्हणणाऱ्या माणसाला काही त्रास होत नाही, पण त्याला चोर म्हटले असेल त्याला आपण चोर नसल्याचे सिद्ध करावे लागते. अफरातफर केल्याचा आरोप सहज करता येतो. पण आपण अफरातफर केली नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ज्याच्यावर आरोप झाला आहे, त्याला कागदपत्रे सादर करावी लागतात. यात बदल झाला पाहिजे. जे लोक चुकीचे बोलतील, चुकीचे आरोप करतील, अशा माणसाला ताबडतोब तुरुंगात पाठवण्यासाठी एक कायदा बदलण्याची आवश्यकता आहे. जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये दोनतृतीयांश रामभक्त असतील, तेव्हाच हे शक्य आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत चारशे हा आकडा पार करून सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांना निवडून देण्याचे रामकार्य तुम्हा आम्हाला करावे लागणार आहे.आफळे बुवांनी दशरथ आणि रामासह इक्ष्वाकू कुळाविषयीची माहिती दिली. रामाची जडणघडण कशी होत गेली, न्याय देणारा, योग्य त्या गोष्टी करणारा, महिला असली तरी अत्याचार करणाऱ्या त्राटिकेला मारणारा आणि अनवधानाने झालेल्या चुकीमुळे शापित झालेल्या अहल्येचा उद्धार करणारा राम विश्वामित्रांच्या शिकवणुकीने तयार झाला. त्याच्यावर जे चांगले संस्कार झाले, त्यामुळेच रामराज्याला महत्त्व आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे, पण त्याचबरोबर रामाचे आदर्श पुढे टिकविण्याचे काम आपल्याला करायला हवे. त्यासाठी बुवांनी विविध पौराणिक कथा आणि उदाहरणांचे दाखले दिले.