
आ. उदय सामंत यांच्या कार्य अहवालाचे अनोख्या पद्धतीने ५०० मान्यवरांनी केले प्रकाशन
रत्नागिरी: माझ्याकडून शहरातील विकासाबाबत ज्या अपेक्षा इथे व्यक्त केल्या आहेत त्याची पुर्तता माझ्या पुढील अहवालात पूर्ण झाल्याचे आपणाला दिसेल असा ठाम विश्वास म्हाडाचे अध्यक्ष व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी कार्य अहवालाच्या प्रकाशनाच्यावेळी उत्तर देताना व्यक्त केला.
रत्नागिरीचे आमदार व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या पाच वर्षाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन अनोख्या पद्धतीने पार पडले. रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील ५०० मान्यवरांनी एकाचवेळी या कार्य अहवालाचे प्रकाशन करून उदय सामंत यांना पुढील निवडणुकीत निवडणून आणण्याचा निर्धारही करण्यात आला. आलेख जनसेवेचा या कार्यअहवालाचा प्रकाशन सोहळा आगळ्या पद्धतीने पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला कोणीही नेते व्यासपीठावर उपस्थित नव्हते. आगळ्या पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याला उपस्थित असलेल्या ५०० जणांनी एकाचवेळी या अहवालाचे प्रकाशन केले. अशा पद्धतीच्या प्रकाशनाचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केल्याचे सामंत यांनी सांगितले. हे आलेले ५०० मान्यवर रत्नागिरीकरांचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांच्या हस्ते झालेला प्रकाशन सोहळ्यालाही तेवढेच महत्व आहे. आपण आपल्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीत जवळजवळ १९०० कोटी रुपयांचा निधी आणण्यात यशस्वी झालो त्याचा अहवाल आपण जनतेसमोर ठेवला आहे. हे सर्व आपल्या पाठिंब्यामुळे झाले असल्याचा उल्लेख सामंत यांनी आपल्या भाषणात केला.आता सेना-भाजप युती असल्याने भाजपही आपल्या विजयात मोठा वाटा उचलेल. येत्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिपक पटवर्धन व माजी आमदार बाळासाहेब माने यांनी आपल्या भाषणात आपल्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे जाहीर केल्याने आता मला मताधिक्क्याची काळजी राहणार नाही असे सांगून रत्नागिरी जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी आपण कोयनेच्या अवजलाचा वापर रत्नागिरी जिल्ह्यात व्हावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करीत होतो. आता मुख्यमंत्र्यानी हे पाणी मराठवाड्याला न्यायचे सुतोवाच केल्यावर आपण प्रथम हे पाणी रत्नागिरी-सिंधुुदुर्ग जिल्ह्याला मिळावे व त्यानंतर उरलेले पाणी मराठवाड्याला न्यावे असे ट्विटरवरून कळविल्यावर त्यांनी या गोष्टीला लगेचच मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांनी रत्नागिरी शहराच्या विकासाबाबत व रस्त्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.
रत्नागिरी शहरात मोठी पाणी योजना येत असून या पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय डांबरीकरण करू नये असा शासनाचा आदेश आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील एकही रस्ता डांबरीकरणाशिवाय राहणार नाही असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. चांगले काम करताना थोड्या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नागरिकांनीही संयम बाळगावा. पुढील मे महिन्यापर्यंत नळपाणी योजनेचे काम पूर्ण होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी तालुक्यातील बेरोजगारीबाबत काही मान्यवरांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यात प्रदूषणविरहित मोठा उद्योग आपण आणणार असल्याचे सामंत यांनी सांगून यासाठी २९, ३० ऑगस्ट रोजी १० मोठ्या उद्योगपतींना रत्नागिरीत निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी प्रदूषणविरहित उद्योग सुरू झाल्यानंतर तालुक्यातील २ हजार लोकांना रोजगार मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण हा कार्यअहवाल प्रकाशनाचा सोहळा कौटुंबिक पद्धतीने साजरा करत आहोत. रत्नागिरीतील मान्यवरांचे आशिर्वाद मिळावेत ही आपली इच्छा आहे. आपल्या उपस्थितीवरून आपण दाखविलेल्या आपुलकीने आपण भारावून गेलो आहोत. रत्नागिरीची परंपरा आहे विधायक कामाला आपण सर्व एकत्र येतो. राजकारणापलिकडे जावून आपल्याला विकास करायचा आहे. इथे टिकेला, दादागिरीला दाद नाही. मी राजकारणात असेपर्यंत रत्नागिरीची सेवा करतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये डॉ. रमेश चव्हाण, डॉ. अलिमियॉं परकार, रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. दिपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, ऍड. बाबा परूळेकर, ऍड. विलास पाटणे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर, सुधाकर सावंत, समीर इंदुलकर, पालव मॅडम, माजी प्राचार्य सुभाष देव यांचा समावेश होता.
www.konkantoday.com