मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दरडप्रवण क्षेत्रात धोका कायम
कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट हा महत्वाचा घाट मानला जातो. या घाटातील चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे या घाटातून प्रवास करताना वाहनाचा वेगही वाढला आहे. मात्र अजूनही घाटातील दरड प्रवण क्षेत्रात धोका टळलेला नाही. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे कामही अजून अपूर्ण आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात घाटातील सुरक्षिततेबाबतचा अंदाज खर्या अर्थाने येणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम अजूनही ठिकठिकाणी सुरू आहे. या चौपदरीकरणातील परशुराम घाटातील काम सुरूवातीपासूनच वादग्रस्त ठरले. त्यामुळे सुरूवातीला प्रशासनाने सुचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हती. मात्र त्यानंतर अत्यंत घाईघाईने कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे परिणामही मागील वर्षी पहिल्याच पावसात दिसून आले होते. अनेक ठिकाणी कॉंक्रीटीकरणाचा भाग खचला. ते खचलेले कॉंक्रीटीकरण तोडून नव्याने केले जात आहे. विशेषतः घाट माथ्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी नव्याने कॉंक्रीटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या घाटातील कामावर अखेरचा हात फिरवला जात असला तरी काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण आहे. www.konkantoday.com