कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या तेजसचा दर्जा घसरत चालला, जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या तेजस ही गाडी सुरूवातीला खास गाडी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे या गाडीला अनेकजण प्राधान्य देत असतात. सुरूवातीला या गाडीत सीटला बसवण्यात आलेले टीव्हीवरून वादंग झाल्यानंतर सध्या या गाडीत टीव्हीची यंत्रणा बंद करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर या गाडीच्या असुविधेत भर पडत असून सध्या वंदे भारत गाडी सुरू झाल्यानंतर या गाडीबाबत अनेक तक्रारी वाढत आहेत. मुंबईत वेळेवर पोहोचणारी गाडी बर्याचशा वेळेला सतत बारा वाजल्यानंतर केव्हाही पोहचत आहे. हे असे असतानाच आता या गाडीच्या देण्यात येणार्या जेवणाबाबत तक्रारी पुढे येत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी भराडी देवीच्या जत्रेसाठी गेलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात कोकण मार्गावरून धावणार्या तेजस एक्स्प्रेसच्या ५ सी डब्यातून मुंबईचा परतीचा प्रवास करणार्या ५० हून अधिक जणांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतप्त प्रवाशांनी कॅटरर्स व्यवस्थापकाला धारेवर धरत कानउघाडणीही केली. कोकणातील गाडी असतानाही प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला असून याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही केली आहे. www.konkantoday.com